दौलताबाद, (प्रतिनिधी) : अब्दीमंडी येथील कृपा प्रसाद गणपती मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे १५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही चोरी ११ ऑगस्टच्या रात्री ते १२ ऑगस्टच्या पहाटेदरम्यान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मंदिराचे पुजारी व मंदिर समितीचे अध्यक्ष किशोर लक्ष्मीकांत नाईक यांनी दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
किशोर नाईक यांच्या मते ११ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे मंदिराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून ते घरी गेले होते. १२ऑगस्ट रोजी पहाटे चारच्या सुमारास ते पूजेसाठी मंदिरात आले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. मंदिरात प्रवेश करून पाहणी केली असता दानपेटीचेही कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. दानपेटीतील रोकड चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंदिराचे सचिव नरेंद्र हजारी यांना माहिती देण्यात
आली.
त्यानंतर दोघांनी पाहणी केली असता दानपेटीतून सुमारे १५ हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे समोर आले. दरम्यान, चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास मंदिराचा कडी-कोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दानपेटी फोडून रोकड लंपास केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दौलताबाद पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेऊन मंदिर परिसरातील परिस्थितीची पाहणी सुरू केली असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.













